मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रात्री उशिरा चौकशीनंतर ईडीने अखेर अटक केली. मागच्या अनेक दिवसांपासून गायब असलेले अनिल देशमुख
सोमवार सकाळी ईडीसमोर हजर झाले. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली.
याच दरम्यान आता भाजपाने अनिल देशमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. “हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना?” असा सवाल कदम यांनी विचारला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यामुळे आता देशमुखांच्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडडचणी अधिक वाढताना दिसून येणार आहे.
राम कदम आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की “पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता दर महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीमध्ये त्यांचे प्रमुख बॉस कोण आहेत? वसुलीचे हिस्सेदार, वाटेकरी, कोण कोण नेते आणि पक्ष आहेत, हे समोर येईल. अन अर्थातच त्या बड्या नेत्यांनाही जेलमध्ये जावे लागेलच” असं राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.