आयपीएल रणसंग्राम २०२१
मुंबई -(राजकीय कट्टा क्रीडा प्रतिनिधी) मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या या मोसमातील दुसऱ्या सामन्यात बलाढ्य अशा चेन्नई सुपर किंग्स संघावर दिल्ली कॅपिटल्स संघाने सात गडी राखून मात केली. त्यामुळे हा विजय महेंद्रसिंग धोनीवर दिल्ली कॅपिटल्स कर्णधार ऋषभ पंत याने मिळवला म्हणूनच ‘शिष्याने केली गुरु वर मात’अशी चर्चा सामन्यानंतर होती.

दिल्ली कॅपिटल संघाने नाणेफेक जिंकत चेन्नई सुपर किंग्स ला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केलं.चेन्नई सुपर किंग्जने १८८ धावाचे लक्ष दिल्ली कॅपिटल संघासमोर ठेवलं यामध्ये सुरेश रैनाने सर्वाधिक ५४ धावा बनवल्या तर एस.करणने १५ चेंडूत ३४ धावा ठोकत चेन्नई सुपर किंग्जला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी मदत केली. तर मोईन अली खानने देखील ३६ धावा बनविल्या.तर अनेक दिवसानंतर पुनरागमन करणारा कर्णधार एम एस धोनी हा मात्र शून्यावर त्रिफळाचीत झाला. दिल्ली कॅपिटल्सकडून खानने २३ धावात २ बळी व सी वोक्सने १८ धावात २ बळी मिळवले.

१८८ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स या संघाच्या फलंदाजाने पृथ्वी शॉने ३८ चेंडूत ७२ धावा तर शिखर धवनने ५४ चेंडूत ८५धावा बनवत दिल्ली कॅपिटल्सचा विजयाचा पाया रचला. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंत यांनी देखील १२ चेंडूत १५ व एम स्टोइनिसने १४ धावा करत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने सात गडी आणि आठ चेंडू शिल्लक राखत जिंकला.चेन्नई सुपर किंग्स कडून शार्दूल ठाकूरने ५३ धावात २ बळी व ब्रावो याने २८ धावात एक बळी मिळविला.
सामनावीर- शिखर धवन