
परांडा (राजकीय कट्टा प्रतिनिधी) भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी विधान परिषद सदस्य तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या परांडा येथील ‘संवाद’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

ही भेट राजकीय कारणांमुळे नव्हती तर आमदार सुजितसिंह ठाकूर हे गेल्या दीड वर्षापासून विविध आजारांना तोंड देऊन घरी परतल्यानंतर त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी होती व पुढील आयुष्यात आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगण्यासाठी होती असे माजी आमदार राहुल मोटे यांनी भेटीनंतर सांगितले.
या भेटीचे पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात कौतुक होत आहे पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी झाले पाहिजे व विकासाच्या कामात हातात हात घेतला पाहिजे हा दृष्टीकोण ठेवून राजकारणात काम केले तर निश्चितच जिल्ह्याचा विकास होऊ शकतो असे देखील सर्वसामान्य कार्यकर्ते या भेटीनंतर चर्चा करताना दिसून आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे परंडा तालुकाध्यक्ष ॲड.संदीप खोसे पाटील जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापतीपुत्र नवनाथ जगताप,बाणगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक भाऊसाहेब खरसडे,परंडा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष वाजीद दखणी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते