
नांदेड (राजकीय कट्टा प्रतिनिधी)
देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर यांचे शुक्रवारी रात्री मुंबई निधन झाले ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर देगलूर बिलोली परिसरात शोककळा पसरली आहे.
आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते पण कालपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होत गेली आणि शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
देगलूर तालुक्यातील अंतापूरचे रहिवासी असलेले रावसाहेब यांनी एक तपापूर्वी राजकारणात प्रवेश केला त्याआधी त्यांनी बांधकाम खात्याच्या विद्युत विभागात दीर्घ काळ नोकरी करून स्वेच्छानिवृत्ती पत्करले होती. २००९च्या आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांनी देगलूर मतदारसंघातून विधानसभेत प्रवेश केला.
त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.