मुंबई | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयानं अटक केल्यानंतर महाविकास आघाडीतर्फे गुरुवारी मंत्रालयाजवळ महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात निदर्शनं केली. हे आंदोलन गांधीच्या शांततेच्या मार्गानं करण्यात आलं असलं तरी यापुढं आक्रमक आंदोलन करण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टमधून तसे संकेत देत भाजपवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टमधून तसे संकेत देत भाजपवर निशाणा साधला आहे. ‘राज्यघटनेनं दिलेला आवाज उठवण्याचा हक्क चिरडायचे प्रयत्न कपटी शत्रू करत असेल तर त्याविरोधात गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच भगतसिंग, राजगुरूंच्या आक्रमकतेच्या मार्गानंही लढावं लागेल,’ असं पवार यांनी म्हटलं आहे.
आमदार रोहित पवार यांनी बिहारमधील मागील निवडणुकाचा संदर्भ देत आणि आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकाचा संबंध जोडत एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये पवार यांनी महटलं आहे, ‘बिहारच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी पेटवण्यात आलेलं अभिनेत्याचं आत्महत्या प्रकरण निवडणूक संपताच शांत झालं, कदाचित २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत हेच भूत पुन्हा उकरून काढण्यात येईल आणि जाहीरनाम्यातही असू शकेल. परंतु हे राजकारण दरवेळी मूळ मुद्द्यांना बाजूला सारू शकणार नाही.
उत्तर प्रदेश निवडणुकीत ध्रुवीकरणाचे कोणतेच प्रयत्न यशस्वी होत नसल्याने होणारी पिछेहाट स्पष्ट दिसतेय. परिणामी महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने दबावतंत्राचं राजकारण करून उत्तर प्रदेशातील उर्वरित टप्प्यांसाठी व आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असावा. आरोप करून रान उठवायचं, बदनामी करून नेरेटिव्ह सेट करायचं, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून संविधानाने दिलेला आवाज उठवण्याचा हक्क चिरडायचा, असे प्रयत्न कपटी शत्रू करत असेल तर त्याविरोधात गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच भगतसिंग, राजगुरूंच्या आक्रमकतेच्या मार्गानेही लढावं लागेल.’ अशा इशाराच जणू पवार यांनी दिला आहे.