उस्मानाबाद( राजकीय कट्टा प्रतिनिधी )साडेतीन पीठापैकी एक महत्वाचे पीठ असलेल्या आई तुळजाभवानीच्या मंदिरात जवळजवळ 100 च्या वर बाल भिक्षेकरी सापडतील. स्त्रीमहात्म्य सांगणाऱ्या आणि महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबाचे कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवानीच्या दर्शनाला लाखो भाविक येत जात असतात. पण दर्शनाला जाताना आसपास कितीतरी अल्पवयीन मुलेमुली भिक्षा मागताना दिसतात. इतर मोठ्या देवस्थानमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अल्पवयीन भिक्षेकरी मुलांचे प्रमाण कधीही दिसले नाही जितके महिलांच्या सन्मानाचे श्रध्दास्थान असलेल्या आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात सध्या दिसत आहे..

भारत हा सर्वात जास्त तरुणांचा देश म्हणून जिथे ओळखला जातो तिथे महाराष्ट्रातील एका साडेतीन प्रमुख पीठांपैकी आई तुळजाभवानीच्या मंदिरात ज्यांच्या हात शाळेची पाटी असायला हवी त्याऐवजी त्यांचे हात भिक्षा मागताना बघुन पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणे आहे. जिल्हाधिकारी हे संपूर्ण जिल्ह्याचे प्रमुख तर असतातच पण त्याबरोबरच ते बाल संरक्षण समितीचे अध्यक्षही असतात आणि त्याच अधिकारातुन त्यांनी ह्या बाल भिक्षेकरींच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी ठोस अशी पाऊले उचलावीत आणि जे कोणी व्यक्ती ह्या बालकांना भिक्षेसाठी प्रवृत्त करत आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही करावी.
कारण बाल न्याय अधिनियम(मुलांची काळजी आणि संरक्षण),2015 मधील कलम 79 अन्वये शिक्षापात्र गंभीर गुन्हा देखील आहे आणि त्यासाठी 5 वर्षापर्यंत कैद व 1 लाख रुपयापर्यंत आर्थिक दंड किंवा दोन्हीही शिक्षेची तरतूद देखील आहे तरी आपण जिल्ह्याचे सर्वेसर्वा आणि बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांना त्यांचे बालअधिकार मिळवून द्यावेत असे निवेदन भाजपा महिला मोर्चा उस्मानाबाद च्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
या प्रसंगी निवेदन देतांना भाजपा महिला मोर्चाच्या अर्चना रविंद्र अंबुरे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य ॲड.पुजाताई देडे, भाजपा युवती जिल्हाध्यक्ष पुजा राठोड, जिल्हा उपाध्यक्षा महिला मोर्चा विद्याताई माने, भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस लतिका पेठे, ओ.बी.सी. सेलच्या तालुकाध्यक्ष सारिका कांबळे इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.