प्रा.सतिश मातने (संपादक राजकीय कट्टा) मुंबई (राजकीय कट्टा पोटनिवडणूक विशेष) काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बिलोली-देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपा समोरा समोर आले आहेत. यामध्ये काँग्रेसकडून दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपाच्यावतीने शिवसेनेचे पूर्वाश्रमीचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी देऊन लढतीत चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील डॉ.उत्तम इंगोले यांना उमेदवारी दिली आहे. डॉ.इंगोले हे देखील सामाजिक कार्यात अग्रेसर असून सामाजिक बांधिलकीतून नागरिकांना वैद्यकीय सेवा देत आहेत त्यामुळे वंचित बहुजन आघाडी देखील या मतदारसंघात मोठी मते घेणार असल्याची चर्चा सध्या आहे.

देगलूर मध्ये पंढरपूर पॅटर्न होणार का? भाजपाने देगलूर-बिलोली विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.या निवडणुकीत देखील त्यांनी आमच्या उमेदवाराला निवडून द्या आम्ही राज्यातील सरकार बनवून दाखवतो अशी पुन्हा एकदा डरकाळी फोडली असली तरी लोकांनी या गोष्टीला किती गांभीर्याने घेतले हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 61 टक्के मतदान झाले होते मात्र यावेळी मतदानाची टक्केवारी तीन टक्क्यांनी वाढून ती 64% पर्यंत गेली आहे. या वाढलेल्या तीन टक्के मताचा फायदा महाविकास आघाडीला होणार की भाजपाला हे निवडणूक निकालानंतर जरी समजणार आहे.या मतदारसंघात पंढरपूर पॅटर्न होणार का? या प्रश्नाचं उत्तर हे नाही असच असण्याची शक्यता आहे. या मतदार संघात महाविकास आघाडी बाजी मारेल असेच वातावरण आहे. भलेही निवडणुकीमध्ये भाजपाने राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना या ठिकाणी प्रचाराला उतरवले असले तरीदेखील सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचा करिष्मा आणि दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने जितेश अंतापूरकर यांच्याबद्दल असलेली सहानुभूती या दोन गोष्टी महा विकास आघाडीला तारुन नेऊ शकतात असाच राजकीय कट्टाच्या प्रतिनिधींचा अंदाज आहे.

आपल्याला काय वाटतं देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघात कोण जिंकून येईल?आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला 94 22 93 44 34 या क्रमांकावर मेसेज किंवा व्हाट्सअप वर कळवू शकता आपल्याकडेही कोणत्या नेत्या बद्दल प्रसिद्ध न झालेली माहिती असेल तीही आम्हाला आपण पाठवा आम्ही ती राजकीय कट्टा मध्ये प्रसिद्ध करू.