
परभणी (राजकीय कट्टा प्रतिनिधी)-जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढली असून मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याबद्दल परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन सहसंचालक यांच्याकडे विचारपूस केली. याबाबत काल शुक्रवार रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाचे जिल्हा सहसंचालक नितीन मरेवार व रेमडेसिवीरचे जिल्हा वितरक विपुल एजन्सी यांच्यासोबत बैठक घेऊन सत्यपरिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी राजकीय कट्टा शी बोलताना परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले की,परभणी जिल्ह्यात पुणे येथील हेत्रो कंपनीच्या वतीने रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येतो. सुरुवातीला परभणी जिल्ह्यात फक्त 10 कोविड सेंटरची नोंद करण्यात आली होती, सद्यस्थितीत 30 कोवीड सेंटर्स नव्याने सुरू करण्यात आले आहेत. नवीन कोविड सेंटरचा कोड जनरेट करण्यात न आल्यामुळे इंजेक्शनची मागणी प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
पुढील एक-दोन दिवसात नव्याने सुरू करण्यात आलेला कोवीड सेंटरचा कोड जनरेट करण्यात येवून मागणीच्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्यात येईल असे हेत्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास पावले यांनी मला सांगितले. त्यामुळे कोरोनावर परिणामकारक ठरणाऱ्या रेमडेसीविर इंजेक्शनचा मुबलक प्रमाणात पुरवठा होईल.
या बैठकीस शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, डॉ. विक्रम पाटील, माजी शहरप्रमुख अनिल डहाळे,नवनीत पाचपोर, ज्ञानेश्वर पवार, दिलीप ताडकळसकर उपस्थित होते.