बार्शी (राजकीय कट्टा प्रतिनिधी)
बार्शी शहरात सध्या आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून विविध प्रकारची खोटी आश्वासने देऊन फसवणुकीचा प्रकार सुरू आहेत .यापासून नागरिकांनी सावध राहावे. शासकीय नियम पाहता ओपन स्पेस हे त्या प्लॉट धारकांच्या सोसायटीच्या मालकीचे असतात त्यामुळे कोणीही फसवणुकीला बळी पडू नये असे आवाहन माजी मंत्री दिलीप सोपल व विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
या संदर्भात सोपल यांनी पुढे बोलताना सांगितले की ,बार्शी मध्ये निवडणुका जवळ आल्या आल्या की,खोट्या आश्वासनांची खैरात होत असते याचाच भाग म्हणून गेली काही दिवसापासून बार्शी शहरातील लेआउट मधील ओपन स्पेस च्या जागा विविध समाजाला देतो, आमदार कोट्यातून समाज मंदिर बांधून देतो या नावाखाली भूमिपूजन कार्यक्रम सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सोपल यांनी पत्रकार परिषदेत शासकीय नियमांचे , जिल्हा नियोजन अधिकारी यांनी सर्व नगरपालिकांना लेआउट मधील ओपन स्पेस वर शासकीय निधीतून कामे प्रस्तावित न करण्याबाबतचे दिलेले पत्र तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांचेकडून ओपन स्पेस संदर्भाने केलेले ठराव रद्द करण्याच्या कार्यवाही चे निकाल सादर केले .
सोपल पुढे बोलताना म्हणाले की विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनांचा पाऊस ही नियमित बाब झालेली आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या गोष्टींचे आश्वासने देऊन फक्त मतावर डोळा ठेवणे हे या मंडळींचे काम आहे यापूर्वी देखील नगरपालिका निवडणुकीत या अनुषंगाने घरपट्टी वरील व्याज माफ करण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात देऊन ते पाळू शकले नाहीत नियमित पाणीपुरवठा आश्वासन ज्यांना पाळता आलेले नाही. ती मंडळी ओपन स्पेस च्या जागा समाजाला देण्याच्या नावाखाली सक्रिय झालेली आहेत. परंतु कोणत्याही समाजाने, यासंदर्भात जे शासकीय नियम आहेत जे सर्वांवर बंधनकारक आहेत ते पाहता कृपया आपली फसगत होऊ नये यासाठी या माध्यमातून आपणास आवाहन करण्यात येते की संबंधित सत्ताधाऱ्यांनी ज्या समाजाला जे ओपन स्पेस देण्याचे आव्हान केले आहे ते ओपन स्पेस दिल्या संदर्भात कोणताही शासकीय पत्रव्यवहार त्यांनी दाखवावा, त्या ठिकाणी शासकीय योजनेतून मिळालेली मंजुरी जिल्हाधिकारी अथवा जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या स्वाक्षरीची दाखवावी .स्थानिक नगरपालिका प्रशासनाला नियम माहीत असताना देखील केवळ दबावापोटी ही मंडळी चुकीचे विषय मंजूर करून घेत आहेत. त्यामुळे कोणाचीही फसवणूक होऊ नये या संदर्भाने सर्वांनी सतर्क रहावे, शासकीय नियम पहावे असे आवाहन सोपल व अक्कलकोटे यांनी केले आहे यापूर्वी 2014मध्ये आम्ही नगरपालिकेत सत्तेत असताना ओपन स्पेसची होणारी दुरावस्था पाहता ओपन स्पेस सुरक्षित राहावे या हेतूने लायन्स क्लब , इंडियन रेड क्रॉस सोसायटी अशा सेवाभावी नोंदणीकृत सामाजिक संस्थांना ओपन स्पेस स्वच्छता देखभाल दुरुस्तीसाठी देण्याच्या संदर्भाने ठराव केले होते .मात्र तत्कालीन विरोधकांनी यासंदर्भात जिल्हाधिकार्यांकडे अपील केल्यानंतर ते ठराव रद्द करण्यात आलेले आहेत असेही ते म्हणाले.
यावेळी सुधीर सोपल माजी नगराध्यक्ष योगेश सोपल नगरसेवक बापु जाधव ,माजी नगरसेवक नागजी नान्नजकर ,वाहिदभाई शेख ,बाजार समिती संचालक मुन्ना डमरे ,आण्णा पेठकर उपस्थित होते.