
भूम (राजकीय कट्टा प्रतिनिधी) लोकांनी नाकारलेल्या पक्षांना राज्य सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे ती आणखी दोन वर्षे आहे,नशिबानं मिळालेली सत्ता भोगा असा घाणाघाती व घरचा आहेर महाविकास आघाडी सरकारला विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला भूम-परंडा-वाशीचे आमदार डॉ.तानाजी सावंत यांनी दिला आहे.ते भूम येथील नगर परिषद अंतर्गत विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलत होते.

तत्पूर्वी भूम येथील शॉपिंग सेंटर उद्घाटन,क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन,स्काय वॉकचे उद्घाटन यासह भूम नगर परिषद अंतर्गत पूर्णत्वास गेलेल्या अनेक कामांची उद्घाटन पार पडली त्यानंतर भूम येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उस्मानाबाद लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हा प्रमुख गौतम लटके कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके,भूम नगरपालिकेचे गटनेते संजय गाढवे, डॉ.तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र घोगरे,भूम पंचायत समितीचे उपसभापती बालाजी गुंजाळ, शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख चेतन बोराडे,भूमचे नगराध्यक्षा सुप्रिया वारे, उपनगराध्यक्षा संयोगिता गाढवे,माजी बांधकाम सभापती दत्ता मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.डॉ.तानाजी सावंत म्हणाले की,महाराष्ट्र मध्ये आताचे सरकार आहे त्या सरकारमध्ये मी जरी असलो तरी भूम-परंडा-वाशी च्या विकासासाठी मी परखड बोलणारा आहे.उजनी धरणातून सीना-कोळेगाव मध्ये पाणी आणण्यासाठी माझे दिवस-रात्र प्रयत्न चालू असून लवकरच हे काम पूर्ण होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच भूम-परंडा-वाशी येथील तालुक्यातील बेकारी कमी करण्यासाठी आतापर्यंत प्रयत्न केले आहेत व भविष्यात ही करणार आहे. भूम नगरपालिकेचे कार्य हे इतर नगरपालिकांना आदर्श असेच आहे, संजय गाढवे यांच्या पाठीशी मी कायम असून भूमच्या नगरपालिकेत भविष्यात देखील संजय गाढवे यांची सत्ता येईल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की,ज्याप्रमाणे राळेगणसिद्धी, हिवरे बाजार,पाटोदा या गावांचा विकास झाला त्याप्रमाणे शहरी भागात विशेषतः ग्रामीण भाग असणाऱ्या नगरपालिकेमध्ये भूम शहराचा जो विकास झाला तो राज्यासाठी आदर्शवत आहे.त्यामुळे पोपटराव पवार ,भास्करराव पेरे पाटील हे जसे ग्रामपंचायत साठी आदर्श आहेत तसेच संजय गाढवे हे देखील नगरपालिकेसाठी राज्यात आदर्श आहेत असे प्रतिपादन त्यांनी केले.

भूम नगरपालिकेचे गटनेते संजय गाढवे आपल्या भाषणात म्हणाले की, गेल्या 15 वर्षापासून भूम शहरांमध्ये विकासाची घोडदौड सुरू आहे त्यातच गेल्या दोन वर्षांमध्ये आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी आम्हाला मिळाला आणि या कामाचे उद्घाटन देखील त्यांच्याच हस्ते व्हावे ही आमची इच्छा होती म्हणून काम पूर्ण होऊन बरेच दिवस झाले मात्र उद्घाटन आज करत आहोत.तसेच माजी आमदार राहुल मोटे यांच्यावरही त्यांनी नाव न घेता टीका करत म्हणाले की, जर भूम नगरपालिका तुमच्यामुळे आली असे तुमचे म्हणणे आहे तर जसा भुमचा विकास झाला तसा आपल्याच नेतृत्वाखाली परंडा नगरपालिकेच्या माध्यमातून परंडा शहराचा विकास का झाला नाही ?या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावे तसेच भूम शहरातील जनता कोणाच्या पाठीमागे आहे हे देखील विधानसभेच्या निवडणुकीत भूम शहरातील लोकांनी दाखवून दिले आहे.
आणि येणाऱ्या नगरपालिकेत देखील पुन्हा आमची सत्ता येणार असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भूमच्या नगराध्यक्षा सुप्रिया वारे यांनी आपल्या भाषणात भूम शहरात गेल्या पाच वर्षात झालेल्या विकासाचा आढावा घेतला तसेच वारदवाडी ते सरमकुंडी हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी आमदार डॉ.तानाजी सावंत व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भूम नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष संयोगिता गाढवे म्हणाल्या की,भूम शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षांमध्ये भूम शहर हे आमचे कुटुंब आहे असे समजून रात्रंदिवस आम्ही पती-पत्नी जनतेसाठी झटत आहोत याचे फळ म्हणून आम्हाला जनतेने तीन वेळा नगरपालिका आमच्या ताब्यात दिली व आम्ही भूम शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न करत आहोत. भविष्यात देखील पैठणच्या धर्तीवर भूम शहरात एक चांगली बाग विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे या सर्व कामासाठी व भविष्यात भूम परंडा वाशीचे आमदार डॉ.तानाजी सावंत हे आमच्या पाठीशी खंबीर उभा आहेत असे त्या म्हणाल्या.भूम-परंडा-वाशीचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या पत्नी वैशालीताई मोटे यांच्यावरही नाव न घेता टीका केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री साठे यांनी केले तर आभार प्रदर्शन यांनी मानले कार्यक्रमास भूम शहरासह तालुक्यातील अनेक युवक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.