कोल्हापूर (प्रा.सतीश मातने -संपादक राजकीय कट्टा) सध्या महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यात होऊ घातलेल्या चार विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामध्ये कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा देखील समावेश आहे.कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व अमल महाडिक यांच्यात सामना रंगणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. अजूनही कोणाची उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी देखील त्या अर्थाने तयारी दोन्ही गटाने सुरू केली आहे. काँग्रेस व भाजपा यांच्यामध्ये ही लढत होत असली तरी या लढतीचे मुख्य सूत्रधार हे मात्र वेगळेच असणार आहेत.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिष्ठापणाला

कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व अमल महाडिक या दोन कुटुंबाभोवती फिरत असली व यांचे पक्ष हे काँग्रेस व भाजपा असले तरी ही लढत खऱ्या अर्थाने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे नेते तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात होणार असल्याची देखील सध्या राज्यभर चर्चा आहे.चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा हा कोल्हापूर आहे तसेच ना.हसन मुश्रीफ व ना.सतेज पाटील हे एका नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे गेल्या काही वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकत्र आहेत.त्यामुळे लढत पाटील-महाडिक गटात होत असली तरीदेखील प्रतिष्ठा मात्र चंद्रकांत दादा व ना.हसन मुश्रीफ यांची पणाला लागणार आहे.
कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी एवढे आहेत मतदार
कोल्हापूर विधान परिषद यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या होणार्या निवडणुकीत जिल्ह्यातील 417मतदार विधान परिषदेचा आमदार ठरविणार आहेत.गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत 35 मतांची वाढ झाली आहे. सन 2015 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत 382 मतदार होते.