कळंब प्रतिनिधी दि.०३– सध्या कौशल्य विकास व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकार व राज्य सरकार हे प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. त्यांच्या प्रयत्नाला प्रतिसाद म्हणूनच डिकसळ ता. कळंब येथे भैरवनाथ अध्यापक विद्यालय परिसरामध्ये 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून भैरवनाथ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय) या नवीन कोर्सला मान्यता मिळाल्याचे धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून कळवले आहे.

भैरवनाथ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय.टी.आयला डीजीटी नवी दिल्ली व डीव्हीईटी मुंबई यांची मान्यता मिळाली असून या ठिकाणी प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास आत्मसात करावे.अत्यंत कमी वयामध्ये म्हणजेच दहावी झाल्यानंतर दोन वर्षांमध्ये विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी व पालक यांनी विचार करावा असेही आवाहन यावेळी त्यांनी केले आहे. भैरवनाथ खाजगी आयटीआय मध्ये इलेक्ट्रिशियन,वायरमन, वेल्डर आणि कोपा या चार कोर्सला मान्यता मिळाली असून याचे प्रवेश सध्या सुरू असल्याचे देखील त्यांनी यात सांगितले आहे. हे प्रवेश शासकीय व व्यवस्थापकीय कोट्यातूनही होतील अशी ही माहिती त्यांनी या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. या नवीन आय.टी.आयमुळे कळंबच्या विकासात देखील भर पडेल व नवीन उद्योजक देखील तयार होतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.