
उस्मानाबाद(राजकीय कट्टा प्रतिनिधी)उस्मानाबाद डीसीसी बँकेची निवडणूक जाहीर झाली असून 24 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख होती. तोपर्यंत 164 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते.त्यापैकी 90 उमेदवारांचे अर्ज छाननी मध्ये पात्र ठरले होते.
पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडीने तीन जागा जिंकत सुरुवातीचा टप्पा जिंकला आहे. उस्मानाबाद डीसीसी बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर ती महाविकास आघाडी(अघोषित) विरुद्ध भाजपा अशी होत आहे. महाविकास आघाडीची अद्याप घोषणा झाली नसली तरी त्या दिवशी त्या दिशेने वाटचाल आहे. आणि म्हणूनच शिवसेनेचे नेतृत्व देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे देण्यात आले आहे.

विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व शिवसेना यांचे प्रत्येकी एक उमेदवार हे बिनविरोध झाल्यामुळे महाविकास आघाडीने भाजपाला पहिल्या टप्प्यात गारद केले आहे. यामध्ये भूम विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार राहुल मोटे यांचे विश्वासू साथीदार मधुकर मोटे यांचा केवळ एकच अर्ज आल्यामुळे त्यांनी विजयी सलामी दिली होती. त्यानंतर काल उमरगा विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून माजी मंत्री बसवराज पाटील यांचे बंधू व डीसीसी बँकेचे माजी चेअरमन बापूराव पाटील यांनीही आपली जागा बिनविरोध काढली आहे तर आज विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून माजी आमदार तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी ही त्यांची जागा बिनविरोध काढण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आता उस्मानाबाद डीसीसी बँकेच्या एकूण पंधरा जागांपैकी तीन जागा या महाविकास आघाडीने जिंकल्यात जमा आहेत.

उर्वरित जागी निवडणूक होण्याची शक्यता असून यामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होण्याची शक्यता आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे उस्मानाबाद डीसीसी बँकेवर वर्चस्व होते मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उस्मानाबाद डीसीसी बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार यांना त्यांच्या पदावरून न हलवता किंवा अविश्वास ठराव न आणता पूर्वी जसे पदाधिकारी होते तेच कायम ठेवले होते त्यामुळे आता या डीसीसी बँकेच्या निवडणुकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना पुढील राजकीय वाटचालीच्या दृष्टिकोनातून डीसीसी बँक निवडणूक महत्त्वाची आहे. निवडणूक किती चुरशीची होते,कोण निवडणुकीत विजयी होते हे आपल्याला २१ फेब्रुवारी रोजी मतमोजणी झाल्यानंतर कळणार आहे. मात्र १० फेब्रुवारी रोजी कोण कोणाच्या विरोध असणार महाविकास आघाडीचे चित्र कायम राहणार का?भारतीय जनता पार्टी त्यातील एखादा मित्र पक्ष,एखादा नेता, सोबत घेणार हे समजणार आहे.