उस्मानाबाद (राजकीय कट्टा प्रतिनिधी) सप्टेंबर,ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गावनिहाय एकूण क्षेत्र,शेतकरी निहाय एकूण क्षेत्र या एकूण क्षेत्रापैकी केलेले पेरणी क्षेत्र, पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी बाधित झालेले क्षेत्र,शेतकरी निहाय व पीक निहाय याची सर्व माहिती तहसीलदार गणेश माळी यांना मागितली होती. परंतु ती माहिती त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप पर्यंत उपलब्ध झाली नाही म्हणून त्यांच्यावर हक्कभंग करणारी कारवाई करा असे पत्र महसूल विभागाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव यांना उस्मानाबाद-कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिले आहे.
या पत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की, वरील माहिती न मिळाल्यामुळे कामकाजात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तसेच माझ्या विधानसभा सदस्यत्वाचा त्यांनी माहिती न देऊन जाणीवपूर्वक अवमान केला आहे. उस्मानाबाद-कळंब मतदार संघातील अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून संसदीय लोकशाहीमध्ये माझे कर्तव्य जबाबदारी व अधिकार आहेत मात्र श्री गणेश माळी यांच्या अशा उद्धट वागण्याने माझ्या कर्तव्यात हक्कात अधिकारात तसेच कामात अडथळा निर्माण झाला आहे.
तसेच श्री गणेश माळी शासकीय कामे तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, जाणीवपूर्वक प्रकरणे प्रलंबित ठेवून दप्तर दिरंगाई करणे, वाद घालणे, मारहाण करणे अशा तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत.त्यामुळे गणेश माळी यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. यापूर्वीही तहसीलदार श्री गणेश माळी यांच्या विरोधात अनेक तक्रारी त्यांच्या वागण्यासंदर्भात आहेत.
त्यातच आता खुद्द कळंब-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनाच माहिती न दिल्यामुळे हे प्रकरण तहसीलदार गणेश माळी यांच्या अंगलट येणार? अशीही चर्चा सध्या सुरू आहे.